- वरोरा तालुक्यात बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा उद्रेक
- शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
- सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- टेमुर्डा बाजारपेठ ठप्प
वरोरा : “बच्चूभाऊ, तुम आगे बढ़ो… हम तुम्हारे साथ हैं!” अशा घोषणांनी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गाव दणाणून गेले होते. शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली टेमुर्डा येथील मार्केट लाईन पूर्णपणे बंद ठेवत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस असूनही सरकारने अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, याचा संताप तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उसळला आहे. “आम्ही पेटलोय, आता आमचा अंत पाहू नका!” असा इशारा ही शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी यावेळी सरकारला दिला.
. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू, कर्जमाफी देऊ, असा विश्वास देऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने निवडणुकीनंतर सहा महिने लोटले तरी केवळ भूलथापा दिल्या, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. बच्चूभाऊंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असतानाही सरकार मूग गिळून गप्प बसलं आहे. त्यामुळे सरकारने आता अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरून सळो की पळो करून सोडू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
![]()
. या आंदोलनात शेतकरी नेते किशोर डुकरे, आशिष रणदिवे, गणेश उराडे, लक्ष्मण आसुटकर, संदीप वासेकर, तुळशीराम आगलावे, सुधाकर डुकरे, अभय आसुटकर, अमोल ढेकणे, उमेश भोंग, दादू तिखट, अशोक भोंग, अरुण डोये यांच्यासह शेकडो व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी सहभागी झाले होते.
. आंदोलनस्थळी “भारत माता की जय”, “जय जवान जय किसान”, “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे”, “दिव्यांगांना ६ हजार मानधन मिळालंच पाहिजे”, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.


