Home चंद्रपुर जिल्हा विशेष सिंदेवाही बस स्थानकात कुत्र्याचा हैदोस

सिंदेवाही बस स्थानकात कुत्र्याचा हैदोस

1114

चावा घेऊन 8 जणांना केले जखमी

सिंदेवाही : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असताना आता शहरातील मुख्य बस स्थानकात या मोकाट कुत्र्यांचा चांगलाच हैदोस सुरू असून आता पर्यंत ८ प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले असल्याने नगर पंचायत कार्यालयाने या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

.     सिंदेवाही बस स्थानकात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावातील मोकाट कुत्रे या पूर्वी चिकन सेंटर चे बाजूला हैदोस घालून रस्त्यावर फिरत असल्याने त्या ठिकाणी अनेक मोटरसायकल चालक पडले आहेत. तसेच किरकोळ जखमी सुद्धा झाले आहेत. अशातच आता सिंदेवाही शहरातील बस स्थानकात परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक पाहायला मिळत आहे. बस स्थानकात आणि शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतला आहे. त्यामुळे प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक गल्ली, मोहल्यात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. या मोकाट कुत्र्यामुळे शहरवासीय हैराण झालेले आहेत. याबाबत अनेकदा वर्तमान पत्रांमधून बातम्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र नगर पंचायत कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने आता अशा मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील मुख्य मार्ग असो, बाजारपेठ असो किंवा गल्ली बोळातील रस्ते असोत, मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे छोट्या मुलांना त्यापासून धोका निर्माण झाला आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असो किंवा बाजारपेठ शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट कुत्रे असो, यामुळे सिंदेवाही शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. आतापर्यंत या कुत्र्यांनी 8 जणांचा चावा घेतला आहे. नगरपंचायत व महामंडळने अशा कुत्र्यांना पकडूंन तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी व सुजान नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!