रामपूर येथील घटना
मुल : जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. त्याच्या मृतदेहाचे अवशेष बफर झोनच्या कक्ष क्रमांक ७५६ मधिल नियत क्षेत्र काटवनमध्ये मंगळवारी सकाळी सापडले. बंडू चिंधूजी कोल्हे (५५) रा. रामपूर असे मृतक गुराख्याचे नाव आहे.
. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेहमीप्रमाणे बंडू कोल्हे हे रामपूर आणि मूल येथील जनावरे व शेळ्या घेऊन जंगलात चराईसाठी गेले होते. काही शेळ्या भटकल्याने ते शोधात होते. त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून शेळ्या घरी आल्या का, याबाबत विचारपूस केली होती. रामपूर ते करून काटवन हा बफर झोनचा परिसर घनदाट जंगलाचा आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. संध्याकाळी गायी, म्हशी आणि शेळ्या न चुकता घरी परतल्या. मात्र, बंडू कोल्हे परतले नाही. पत्नीने गावात ही माहिती दिली. वनविभागाला सूचना देण्यात आली. मूल येथील बफर झोनचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी जंगलात शोधमोहीम राबवली. संध्याकाळपर्यंत थांगपत्ता लागला नाही. घनदाट जंगल आणि अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.


