संविधान वाचवाचा नारा
बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी
भद्रावती : येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर एक धक्कादायक घटना समोर आला. बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्या लता शिंगाडे यांनी बूथ क्रमांक ३०९ वर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) फोडून ‘ईव्हीएम हटाव संविधान वाचवा’ अशा घोषणा दिल्या.
. मतदान सुरू असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शिंगाडे यांनी ईव्हीएम ऐवजी कागदी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करत निषेध केला. या घटनेमुळे सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती.
. शिंगाडे जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि त्यांनी अचानक ईव्हीएम मशिनला लक्ष्य करून नुकसान केले. यानंतर त्यांनी घोषणाबाजी करत बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. तेथे उपस्थित असलेल्या मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत महिलेला पकडून पोलिसांना माहिती दिली. भद्रावती पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल काचोळे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठून शिंगाडे याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
. ईव्हीएम फोडण्याच्या या घटनेमुळे काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत होऊन तेथे उपस्थित मतदारांची गैरसोय झाली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
. या घटनेने भारतातील ईव्हीएमचा वापर आणि पारदर्शकता यावर सुरू असलेल्या वादावर पुन्हा प्रकाश टाकला. एकीकडे काही पक्ष आणि नेते निवडणुकीसाठी ईव्हीएम सुरक्षित मानत असताना, दुसरीकडे अनेक संघटना आणि कार्यकर्ते पारदर्शकतेचा अभाव आणि संभाव्य अनियमितता दाखवून बॅलेट पेपरची मागणी करत आहेत. लता शिंगाडे यांचे हे पाऊल त्यांना संविधान आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची जाणीव दर्शवते, पण कायदा हातात घेणे समर्थनीय ठरू शकत नाही. आता पोलीस आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहेत, जेणेकरून दोषींवर योग्य ती कारवाई करता येईल.


