Home राजकीय अपक्ष उमेदवार ठरणार प्रमुख लढतीतील उमेदवारांची डोकेदुखी

अपक्ष उमेदवार ठरणार प्रमुख लढतीतील उमेदवारांची डोकेदुखी

1358

वरोरा विधानसभा मतदारसंघ

बंडखोरीचा फटका राजकीय पक्षांना होणार काय ?

रवी खाडे
चंद्रपुर : महायुती, महाविकास आघाडी, प्रहार, मनसे व वंचित अशा प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र वरोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडी च्या बंडखोर अपक्ष उमेदवारांसह इतर अपक्ष उमेदवारांचा फटका प्रमुख लढतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वरोरा मतदार संघाची निवडणुक चुरशीच्या व रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

.      वरोरा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांच्याही अधिकृत उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. यामुळे या मतदारसंघात बहूरंगी लढतीची शक्यता असली तरी मुख्य लढत भाजपा, काँग्रेस, प्रहार आणि शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे यांच्यातच होणार आणि ती अतितटीची राहणार असल्याचे चित्र आहे.

.       वरोरा विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात आहे. यात महा विकासआघाडी तर्फे काँग्रेसचे प्रवीण काकडे, महायुतीतर्फे भाजपाचे करण देवतळे, तिसऱ्या आघाडी कडून लढणारे प्रहारचे अहेतेशाम अली, शिवसेना (उबाठा) चे बंडखोर मुकेश जीवतोडे, डॉ. चेतन खूटेमाटे, भाजपा बंडखोर राजू गायकवाड, मनसेचे प्रवीण सूर, वंचित चे अनिल धानोरकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. महायुती आणि महा विकासआघाडी अशा दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. यामुळे सुरुवातीला महायुती आणि महाआघाडी उमेदवारांना मत विभाजनाची मोठी भीती व्यक्त केली जात होती. परंतु त्यात आता बदल होताना दिसत आहे. सुरुवातीला बंडखोरी करणारे आघाडी व युतीचे उमेदवार मतदारांमध्ये चांगलेच चर्चेत आले होते. तसेच अपक्ष म्हणून लढणारे आणि बंडखोरी करणारे उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु मतदानाची तारीख जसजशी जवळ येत गेली तसतसी आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची प्रचारात सरशी पाहायला मिळाली. प्रारंभी काँग्रेस उमेदवार मागे पडत चालल्याचे म्हटले जात होते. परंतु अलीकडे त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा झालेला एकोपा पाहता शेवटी ही लढत भाजपाचे करण देवतळे आणि काँग्रेसचे प्रवीण काकडे यांच्यातच होते की काय असा प्रश्न आहे. प्रहार चे अहेतेशाम अली, अपक्ष मुकेश जीवतोडे, डॉ. चेतन खूटेमाटे या उमेदवारांनी आपले स्पर्धेतील आवाहन कायम ठेवत चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे. यामुळे मत विभाजनावर विजेत्या उमेदवाराचे बरेच गणित अवलंबून असणार असून सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

धनोजे कुणबी समाज कुणाच्या पाठीशी ?                                                                                                                                                 वरोरा विधानसभा मतदार संघात मोठया प्रमाणात धनोजे कुणबी समाज आहे. हा धनोजे कुणबी समाज नेहमी धानोरकर कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र आता धनोजे कुणबी समाजाचे प्रमुख उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे प्रवीण काकडे, अपक्ष मुकेश जिवतोडे, डॉ. चेतन खुंटेमाटे, मनसे चे प्रवीण सूर आणि वंचित चे अनिल धानोरकर हे आहेत. धनोजे कुणबी समाजाचे पाच उमेदवारांमधील लढत रंगतदार अवस्थेत आली आहे. या पाच धनोजे कुणबी उमेदवारांसाठी या भागातील समाजाची मते निर्णायक ठरणार असून नेमका धनोजे कुणबी समाज कुणाच्या पाठीशी राहणार याचे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!