Home राजकीय मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता अहेतेशाम अली यांना निवडून द्या

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता अहेतेशाम अली यांना निवडून द्या

1318

माजी मंत्री बच्चू कडू यांचे आवाहन

वरोरा : काँग्रेस पन्नास वर्ष सत्तेत होती. आणि या पन्नास वर्षात सामान्य माणसांना लुटण्याचे काम प्रथम काँग्रेसने आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाने केले. कापूस, सोयाबीनचे भाव पडले त्याविरुद्ध आवाज उठविणारा कोणी नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. एकंदरीत परिस्थितीवर नजर टाकली तर सामान्य माणूस तसेच शेतकऱ्यांनी कसे जगावे असा प्रश्न आहे. परिणामी या सर्वांच्या न्याय व हक्कासाठी परिवर्तन आघाडी कडून उभे असलेले प्रहारचे अहेतेशाम अली यांना भरघोस मतांने विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मतदारांना केले. ते रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले उमेदवार अहेतेशाम अली‌‌ यांच्या प्रचाराकरिता वरोरा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते.

.      पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आली की काही लोकांना जाती आणि धर्म आठवतो. तुम्हा आम्हाला जाती-पाती आणि धर्मामध्ये गुंतवून हे सत्ता मिळवतात. यांचा हा डाव आता उलटून टाका. आपले सरकार आल्यास आपण शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्या विरोधातील कायद्यात बदल करू, घरकुलाची अनुदान राशी वाढवू असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिला.

.       सदर प्रचार सभेवेळी व्यासपीठावर उमेदवार अहेतेश्याम अली, शेतकरी संघटनेचे विदर्भवादी नेते, ॲड. शरद कारेकर, सतीश बिडकर, रवी पवार, दादा झाडे, तुळशीराम श्रीरामे, भास्कर तुमराम, गूलाब बदखल,अमोल काटकर, शाहिद अली, चंद्रकला मत्ते, बंडू लभाने, शरद मडावी, पवन वरघने, आतिश बोरा, जुबेर कुरेशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

.     वरोरा शहराच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत आपण निधी खेचून आणला आणि वरोरा शहराचा चांगला विकास केला. जात-पात न पाहता अडीअडचण घेऊन येणाऱ्या गोरगरिबांना सर्वधर्म समभाव जोपासून यथाशक्ती मदत केली. मंदिर, महिलांच्या बचत गटाच्या कार्यालयासाठी जागा दिली. तसेच विविध सामाजिक संघटनेला समाज भवनाकरिता जागा दिली. माझा पिंड हा समाजसेवेचा असून या सेवेला पदाची जोड मिळण्यासाठी आपण मला साथ द्यावी, तुमची साथ लाभल्यास क्षेत्राचा अपेक्षित विकास, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल असे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अहेतेशाम अली यांनी म्हटले. तसेच स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती करणाऱ्या कंपन्यांना आपण त्यांची जागा दाखवू असा विश्वास त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिला. सदर प्रचार सभेत विविध सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश घेतला. सभेला मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

error: Content is protected !!