वनविभागाचा अंदाज
नवरगाव उपवन क्षेत्रातील अंतरगाव येथील घटना
सिंदेवाही : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील अंतरगाव शेत शिवारात मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर बिबट्याचा मृत्यू हा पट्टेदार वाघाच्या झुंजीत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
. सध्या सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र वाघ, बिबट, यासारखे वन्यप्रान्यांचा संचार जिकडे तिकडे सुरू आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या अनेक घटना घडत असून वाघांच्या दहशतीने नागरिकांचे जीवन भयभीत झाले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास देलनवाडी शेत शिवारात मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती विभागाला मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा स्थळ पंचनामा केला. सदर बिबट्याचा मृत्यू हा दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाला असावा , असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पट्टेदार वाघाच्या आणि बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे सदर बिबट्याचा मृत्यू हा वाघाच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज उपस्थित पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला. घटनेची माहिती ब्रम्हपुरी विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली.
. सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.चोपडे, सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, नवरगावचे क्षेत्र सहाय्यक एस.बी.उसेंडी, वनरक्षक नितेश शहारे, विकास येरमे, स्वाब नेचर केअर फाऊंडेशन चे कायारकर, पशुधन विकास अधिकारी बजरंग सावरे इत्यादी घटनास्थळी पोहचून मृत बिबट्याचे निरीक्षण केले. आणि सदर प्रकार शिकार नसल्याची खात्री करून वनगुन्हा नोंदविण्यात आला. व मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यासमोर मृत बिबट्याला अग्नी देण्यात आली.


