उपप्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर घेतो बघ्याची भूमिका
सामान्य वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
कोठारी : सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास परिवहन अधिकारी, हायवे पोलीस व प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. चंद्रपूर, गडचिरोली आरटीओने सुरजागड ओव्हरलोड वाहतुकीवर आजपर्यंत किती गुन्हे नोंदवले आहेत, याचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवल्यास त्यातील सत्य बाहेर येईल. मात्र ग्रामीण भागात किरकोळ गुन्ह्यांची नोंद करीत असले तरी त्यातुलनेत सुरजागड ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करण्यात अपयशी झाल्याचे दिसत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूरचे अधिकारी दररोज चंद्रपूर-गोंडपीपरी मार्गाने गस्त करीत असतात. त्यांचेकडून लहानसहान वाहनांची तपासणी व कारवाई केल्या जात असल्याचे समजते मात्र सुरजागड वाहनांना थांबविण्याची हिम्मत आजपर्यंत दाखवीली नाही.
. राज्यभरातील ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र, त्यानंतरही कारवाईच केल्या जात नाही. मागील दोन वर्षात किरकोळ गुन्हे दाखल झाले आहे. ओव्हरलोड वाहनांवर थातुरमातून कारवाई करून आणि दंडवसूली करून मोकळे सोडल्या जात आहे.
. मोटार वाहन कायद्यांतर्गत ओव्हरलोड वाहनांवरील कारवाई करताना, चालकांचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित करायचा असतो, ओव्हरलोड मालाची टनाप्रमाणे दंड वसूली आणि वाहनांची जप्ती करून राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांच्या रस्त्यांचे नुकसान केल्याचे मुल्यांकन करून त्या वाहनावर गुन्हा दाखल करायचा असतो. मात्र, अशाप्रकारची कारवाईच होत नाही. त्यामूळे जिल्ह्यात मालवाहतुकदारांकडून सर्रास ओव्हरलोड वाहतुक केली जात असल्याचे दिसून येत आहे.
सुरजागड वाहतुकदारांचा हैदोस गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, आल्लापल्ली, आष्टी व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी, कोठारी, बल्लारपूर व घुगूस या पोलीस स्टेशन हद्दीतून नियमबाह्य बेकायदा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाने लोहखनिजाची सर्रास वाहतुक केल्या जात आहे. त्यामूळे गावांसह, महामार्गांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वाहतुकी विरुद्ध कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास प्रकल्प अधिकारी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याने स्थानिक जनतेत भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. वाहतुकीचे नियम सर्वसाधारण लोकांनाच, सर्वसाधारण जनतेकडून कागदपत्रांची,हेल्मेटची विचारपूस करून कारवाई केली जाते. परंतु सुरजागड ओव्हरलोड वाहनावर कारवाई का होत नाही असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
. मोटार वाहन कायद्यात ओव्हरलोड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचे कठोर नियम दिले आहे. मात्र, त्याचा वापर होत नाही. त्यामूळे राष्ट्रीय महामार्ग खराब होत असून, अपघातांचे सुद्धा प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन वर्षात अनेक अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला. ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याच्या नुकसानीचे तांत्रिक मूल्यांकन गरजेचे असल्याने अनेकवेळा गुन्हे दाखल करण्यास चालढकल केल्या जात असल्याचे वास्तव आहे. सुरजागड वाहनाचा वाहतूक परवाना ४० टनाचा मात्र प्रत्यक्ष ४५ ते ५० टन मालाची वाहतूक करीत असल्याचे पुरावे आहेत. मात्र कारवाई तरी कोण करणार असा सवाल निर्माण केल्या जात आहेत.


