तक्रारदार मुरलीधर गायकवाड जनहित याचिका दाखल करणार
सिंदेवाही : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (बफर) शिवणी येथील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लाखो रुपयाची हेराफेरी करून गैरव्यवहार केला असल्याने शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी तक्रार करून रोखलेखा चौकशीची मागणी केली आहे. मात्र सदर प्रकरणातील चौकशी अधिकारी यांनी तक्रारदार यांना काहीही कळविले नसल्याने व चौकशी झाली असल्याचा खोटा अहवाल प्रशासनाला पुरविला असल्याने सदर प्रकरणाची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात असून याबाबत लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे तक्रारदार मुरलीधर गायकवाड यांनी माध्यमांना कळविले आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) यांनी वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था यांचे सोबत संगनमत करून शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय कामे न करता आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था मर्यादित वासेरा या संस्थेच्या बँक खात्यात सन २०१९ ते २०२३ या दरम्यान लाखो रुपयांची रक्कम जमा करून आधार संस्थेचे पदाधिकारी तसेच संचालक यांचे नावाने रक्कम काढून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. आधार या संस्थेने बँक मधून नगदी स्वरूपात रक्कम काढली असल्याने संस्थेला मोठ्या प्रमाणात टीडीएस भरावा लागला आहे. तसेच मशनरीचे खोटे आणि बनावट बिल दाखविल्या गेले आहेत. मजुरीची रक्कम नगदी स्वरूपात दिली असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र कोणत्याही मजुरांचे व्हावचर जोडण्यात आलेले नाहीत. आधार संस्थेचे रेकॉर्ड व बँक खात्याची तपासणी केली असता वरील सर्व प्रकार निदर्शनास आले आहेत.
. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यकाळात लाखो रुपयांची अफरातफर झाली असल्याने तक्रारदार मुरलीधर गायकवाड यांनी वरील सर्व प्रकाराची रोखलेखा चौकशी करण्याची मागणी केली असता, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी ९ ऑगस्ट २०२४ चे पत्राअन्वये उपसंचालक (बफर) कार्यालय चंद्रपूर यांना रोखलेखा चौकशी बाबत कळविले. परंतु चौकशी अधिकारी उपसंचालक (बफर) कार्यालय चंद्रपूर यांनी तक्रारकर्ते मुरलीधर गायकवाड यांना चौकशी बाबत काहीच कळविले नसल्याने चौकशी अधिकाऱ्यांचे कामाविषयी संशय व्यक्त करून सदर प्रकरणाची चौकशी संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप तक्रारदार मुरलीधर गायकवाड यांनी केला आहे. वरील लाखो रुपयांच्या अफरातफर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून योग्य चौकशीची मागणी केली असून मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्याय मागणार असल्याचे तक्रारदार मुरलीधर गायकवाड यांनी माध्यमांना कळविले आहे.


