सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना
सिंदेवाही : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत डोंगरगाव बिटात शनिवारी दुपारी ११.३० वाजताचे दरम्यान एका पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात डोंगरगाव येथील एक मजूर ठार झाला. विलास तुळशीराम मडावी (५२) असे मृतकाचे नाव आहे.
. मृतक विलास मडावी हे काही मजुरांसोबत धान बांधण्यासाठी सिंधी आणण्याकरिता डोंगरगाव बिटातील कक्ष क्रमांक २५२ या क्षेत्रात गेले होते. त्याठिकाणी एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. मृतक विलास हे सिंधी कापत असताना अचानक वाघाने विलास मडावी यांचेवर झेप घेऊन त्याला ठार केले. व घटनेपासून काही अंतरावर ओढत घेऊन गेला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी मोबाईल वरून लगेच घटनेची माहिती गावात दिली. त्यामुळे गावातील नागरिक त्वरित कक्ष क्रमांक २५२ चे दिशेने धावले. मात्र तो पर्यंत विलास मडावी हे मृत्युमुखी पडले होते. गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभाग आणि पोलीस विभागाला दिली. त्यानुसार सिंदेवाही पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी आपले सहकारी घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर हे सुद्धा आपली चमू घेऊन तात्काळ घटनास्थळावर पोहचले. व घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
. मृतक विलास तुळशीराम मडावी हे घरचे एकमेव कमावते व्यक्ती असून त्यांचे पश्चात पत्नी आणि एक मुलगा असल्याने कुटुंबियांवर खूप मोठा आघात झालेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत केली असून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत लवकरच कुटुंबीयांना देणार असल्याचे सांगितले आहे. शवविच्छेदनानंतर मृताचे प्रेत कुटुंबीयांचे स्वाधीन करण्यात आले असून डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


