Home राजकीय विनोद बुटलेची काँग्रेसला “सोडचिठ्ठी” शिवसेनेशी घरोबा

विनोद बुटलेची काँग्रेसला “सोडचिठ्ठी” शिवसेनेशी घरोबा

1299

 शिवसेना (शिंदे) जिल्हा युवा सेनेची जबादारी 

 बल्लारपूर तालुक्यात कॉंग्रेला खिंडार 

कोठारी : गेली वीस वर्षांपासून काँग्रेसचे बल्लारपूर तालुक्यात नेतृत्व करणारे माजी तालुका अध्यक्ष विनोद बुटले यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी व वर्चस्वाला कंटाळून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे) पक्षात घरोबा करून चंद्रपूर जिल्हा युवा सेना प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली असल्याने काँग्रेस मध्ये खळबळ उडाली.

.        बुटलेच्या पक्षांतराने बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडले असून भविष्यात बल्लारपूर तालुक्यासह चंद्रपूर, राजुरा तालुक्यात शिवसेनेची पक्ष बांधणी करून मजबूत करण्याची बुटले यांनी प्रतिक्रिया दिली. सन २००५ पासून वयाच्या १९ वर्षी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसचे कामास सुरुवात केली. ज्या कालावधीत बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसला घरघर लागली होती. व भाजप तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा बिकट परिस्थितीत पक्षाची धुरा खांद्यावर घेत गावागावात मोर्चेबांधनी करून पक्षाला उभारी देण्याचे काम बुटले यांनी सुरू केले. तालुक्यात अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेत सत्तांतर घडवून आणले. भाजपच्या बालेकिल्यात सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींना निर्वाचित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

.        कोठारी ग्राम पंचायतीमध्ये दोनदा सदस्य व आई गोपिका बुटले यांना सरपंच पदावर आरूढ करून भाजपच्या रणनीतीला उद्धवस्त करीत सत्ता काबीज केली. त्यानंतर बल्लारपूर तालुक्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्यानंतर पक्षीय नेत्यांनी गटबाजी करीत मार्गावर अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू झाल्याचे बुटले यांनी सांगितले. तालुक्यातील गोरगरिबांच्या कामासाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून बुटलेची ओळख आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची वेळोवेळी अव्हेलना होत होती. कोठारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यास पक्षाने उमेदवारी देण्याचे टाळले. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले स्वतःचा चार मताने पराजय झाला. मात्र कोठारीतून सरपंचासह सर्व उमेदवारांना पराजयाची धूळ चारली. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यापासून धडा शीकण्याऐवजी पुन्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना डावलण्याचे छडयंत्र सुरू करण्यात आले. त्यामुळे व्यतीत होऊन नाईलाजाने मनातून इच्छा नसतानाही शिवसेनेत प्रवेश घ्यावा लागला. आता तालुक्यात शिवसेना मोठ्या जोमाने उभी करून काँग्रेसला शह देण्याची आखणी करण्यात येणार आहे.

.        शिवसेनाप्रमुख पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे सामान्य जनतेच्या विकासाचे व्हिजन असून यापुढे शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी निरंतर प्रयत्न करणार आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी नेटाने काम करून आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष भक्कम उभा करणार आहे. काँग्रेसला सोडून आपण चूक केली नसून त्याचे जाचातून मुक्त झाल्याचे समाधान विनोद बुटले यांनी व्यक्त केले.

.        यावेळी किरण पांडव, शुभम नवले, हर्षल शिंदे, भरत गुप्ता, प्रतिभा ठाकूर, श्रेयाश ठाकूर, पियुष ठाकूर, नयन जंगम, जमील शेख व कमलेश शुक्ला आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!