सरस्वती ज्ञान मंदीर, नागभीड येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

22

नागभीड

.          स्थानिक सरस्वती ज्ञान मंदीर, नागभीड येथे नवीन वर्षाचे आगमनाचे औचीत्य साधत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तर संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आंनद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी विनोद मेश्राम, मीनाक्षी गावंडे यांची उपस्थिती होती. यात विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ घरून बनवून आणून त्याची विक्री केली. यातून विविध पदार्थाची ओळख, नफा-तोटा,आर्थिक देवाण घेवाण, व्यवहारीक क्रिया यांची ओळख होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.          क्रीडा सत्राचे उदघाटन इयत्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थी प्रतिनिधिनींनी केले. या क्रीडा सत्रात खो-खो, कब्बड्डी, २०० मिटर धावणे, लंगडी, चमचा गोळी इत्यादी प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांना व सर्व टीम ला संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या टीम व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२४ रोजी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन नागभीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी केले ,अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक संजय येरणे, आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील हटवार व राहुल कळंबे, पालक प्रतिनिधी दिनेश समर्थ, शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण वाडीकर यांची उपस्थिती होती.

.          यावेळी राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार २०२३ मिळाल्याबद्दल व शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , नवेगाव हुंडेश्वरी येथे कार्यरत संजय येरने व जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पारडी ठवरे येथील कार्यरत शिक्षक सुनील हटवार, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कोटगाव येथे कार्यरत राहुल कळंबे या सर्वांचा शाळेच्या वतीने शाल,गुलाबाचे फुल, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या सहा. शिक्षिका किरण वाडीकर यांनी केले.