Home चंद्रपुर जिल्हा विशेष “अक्षय निकुरे अमर रहे” च्या जयघोषात शहीद जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

“अक्षय निकुरे अमर रहे” च्या जयघोषात शहीद जवानाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

1199

अंतिम दर्शनासाठी लोटला जनसागर

हवेत तीन फेरी झाडून अखेरची मानवंदना

वरोरा : अमर रहे, अमर रहे, शहीद अक्षय निकुरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम च्या जयघोषात अक्षय निकुरे या शहीद जवानाला गुरुवारी (दि. २५) स्वगावी पिंपळगाव मारुती येथील स्मशानभूमीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. मराठा -११ बटालियनच्या चमुने हवेत तीन फेरी झाडून अखेरची मानवंदना दिली. अंतिम दर्शनासाठी हजारोच्या संख्येने जनसागर लोटला होता.

.     जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी भारतीय सैनिकांचे वाहन खोल दरीत कोसळून ‌ अपघातात झाला होता. सदर अपघातात ‌शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये वरोरा तालुक्यातील पिंपळगाव (मारोती) येथील अक्षय दिगंबर निकुरे याचा समावेश होता होता. शहीद झालेल्या अक्षयचे पार्थिवावर गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी त्याच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

.      गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी शहीद अक्षयचे पार्थिव घेऊन कामठी आर्मी सेंटरची चमू सकाळी १०:३० च्या सुमारास‌ टेमुर्डा येथे पोहोचल्यानंतर हजारोच्या संख्येने उपस्थित चाहत्यांनी त्या वाहनाकडे धाव‌‌ घेतली. तिथून अक्षय निकुरे अमर रहे च्या घोषणेत त्याचे पार्थिव ‌पिंपळगाव या त्याच्या मूळ गावी पोचल्यानंतर गावाच्या वेशीवर आमदार करण देवतळे यांनी त्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून सर्वप्रथम आपली श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर अमर रहे, अमर रहे, अक्षय निकुरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणा देत निघालेली त्याच्या पार्थिवाची मिरवणूक त्याचे राहते घरी पोहचली.

.     यावेळी परिसरातील चाहत्यांचा जनसागर अंतिम दर्शनाकरिता लोटला होता. पार्थिव घरी पोहोचताच उपस्थित नातलग, आई-वडील व नातलगाने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. यानंतर त्याच्या राहत्या घरून अंतिम यात्रा स्मशानभूमीत पोहचली. अंतिम यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी तिरंगी ध्वज व शहीद अक्षय बाबत आपल्या शोकसंवेदना व्यक्त करणारे फलक लावण्यात आले होते.

.      ही अंतिम यात्रा स्मशानभूमीत पोहचल्यानंतर त्याचे शव फुलांनी सजवलेल्या टेबलवर ठेवण्यात आले. यानंतर सर्वप्रथम शासनातर्फे तहसीलदार योगेश कौटकर यांनी तर यानंतर उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, शहीद अक्षयचे धाकटे बंधू निलेश व आई वडील, पिंपळगावच्या सरपंच सुचिता ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

.     मराठा -११ बटालियनच्या चमुने हवेत तीन फेरी झाडून शहीद अक्षय निकुरेला अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शहीद अक्षय निकुरेच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. शासकीय इतमानामात पार पडलेल्या या अंतिम संस्काराला राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परिसरातील शाळांनी देखील सुट्टी दिली होती.

error: Content is protected !!