चार महिन्यापासून विद्युत ट्रांसफार्मर बंद
ऐन हंगामात शेतकऱ्यांची परवड
वरोरा : जून महिन्यात झालेल्या वादळ वाऱ्याने पोल कोलमडले. विद्युत वाहिन्या तुटल्या. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पोल उभे करीत विद्युत वाहिन्या जोडल्या मात्र विद्युत ट्रान्सफार्मर सुरु केले नाही. पावसाळा असल्याने शेतकऱ्यांना विजेची गरज पडली नाही. आता मात्र पिकांना पाणी देण्याची वेळ आली. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर सुरु करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अर्ज केले मात्र विद्युत ट्रान्सफार्मर सुरु केल्या गेले नसल्याने वीज वितरण कंपनीचे अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागतं आहे.
. वरोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावातील, शेत शिवारातील विजेचे पोल कोलमडले, तारा तुटल्या त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने व गरजेच्या वेळेत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेत पिकांना पाणी देण्याची गरज पडली नाही. त्यामुळे विजेचा वापर झाला नाही. आता खरीप हंगामातील कापूस, धान या पिकाला पाणी देणे गरजेचे झाले व रब्बी हंगाम सुरु झाल्याने चणा, गहू, सह इतर पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे मात्र ऐन हंगामात विद्युत ट्रान्सफार्मर बंद असल्याने वरोरा तालुक्यातील आसाळा येथील शेतकरी सिंचनापासून वंचित असून पिके करपू लागली आहे.
. आसाळा शेत शिवारातील विद्युत ट्रान्सफार्मर जून महिन्यापासून बंद असल्याची तक्रार वीज वितरण कंपनी ला देण्यात आली. मात्र चार महिने लोटूनही याकडे वीज वितरण कंपनी कानाडोळा करीत आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सिंचना साठी विविध योजना राबवित शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर शेतकऱ्यांचे वीज बिल सुद्धा माफ केल्या जात आहे. तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत चिरीमिरीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांकडून मिटर देण्याच्या नावाखाली हजारो रुपये उखळल्या जात असल्याने शहरातील समस्याकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी मोठ्या जातीने लक्ष देतात मात्र खेड्यातील शेतकऱ्यांची या अधिकाऱ्याकडून थट्टा केली जात आहे.
तात्काळ डीपी लावा अन्यथा आंदोलन करू शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र शेतातील कृषी पंपाची डी पी बंद असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे. शेतकऱ्यांना शेतीचे कामे सोडून तालुक्याच्या वीज वितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे त्यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बंद असलेली कृषी पंप डी पी तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल. किशोर डुकरे, शेतकरी नेते, वरोरा


