कांग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा आशावाद
बल्लारपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सभा
विसापूर : महाराष्ट्राची भूमी पुरोगामी विचारांची आहे.प्रतिगामी विचार धारेला येथे स्थान नाही. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला आहे. या विचारधारेवर विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी लढत आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन होणार आहे. कांग्रेसचे उमेदवार संतोष सिंग रावत विजयाची पताका रोवणार आहेत, असा आशावाद कांग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांनी बुधवारी बल्लारपुरात व्यक्त केला.
. बल्लारपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंग रावत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी जनसमुदयाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कन्हैया कुमार म्हणाले, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक देशात व राज्यात संघ विचारधारेवर राजकारण करत आहे. त्यांच्या विचारधारेमुळे समाजासमाजात विष पेरले जात आहे. परिणामी संविधान धोक्यात आले आहे. फुट डालो और राज करो, हीच त्यांची निती आहे. या विचारधारेला राज्यातील व बल्लारपूर मतदार संघातील मतदार भूलणार नाही. या निवडणुकीत बल्लारपूर मतदार संघातील कांग्रेसचा वनवास संपणार आहे. संतोष सिंग रावत परिवर्तन घडविणार आहेत. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे, असे ते म्हणाले.
. यावेळी व्यासपीठावर बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष सिंग रावत, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिमव बॅंकेचे माजी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख (उबाठा) संदीप गिर्हे, कांग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम, पवन भगत, रोशनलाल बिट्टू, रिपाईचे अशोक निमगडे, आपचे किशोर पुसलवार, कांग्रेसचे राष्ट्रीय निरीक्षक जफर हैदर, सूर्य प्रभा शेट्टीयार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेचे संचालन नगरपालिकेचे माजी गट नेते देवेंद्र उर्फ पप्पा आर्य यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


