बल्लारपूर तालुक्यातील ग्रीड पाणी पुरवठा योजनेतील वास्तव
जीवन प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील तब्बल १८ गावातील नागरिकांना हर घर, नल से जल देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. याला ग्रीड पाणी पुरवठा योजना असे नाव देण्यात आले. सदर योजना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवली जात आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाच्या कामकाजावर आजघडीला प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धोरणकर्त्यांच्या डोळेझाकपणामुळे ‘ जल जीवन मिशन ‘ चे काम अधांतरी लटकल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी कोट्यवधींचा खर्च होऊन देखील नळधारकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवकुंड व चुनाभट्टी, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती, बामणी, बामणी (दुधोली), लावारी, दहेली, कोर्टीमक्ता, कोर्टीतुकूम, केमतुकूम, कळमना, जोगापूर, पळसगाव, किन्ही आणि कवडजई आदी १८ गावातील नागरिकांना नळधारकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी म्हणून ग्रीड पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे.
. ‘ जल जीवन मिशन ‘ अंतर्गत हर घर, नल से जल देण्याच्या अनुषंगाने १४ जून २0२२ रोजी ग्रीड पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान केली आहे. ही महत्वकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी ८ कोटी २४ लक्ष १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने ठिकठिकाणी जलकुंभ उभारण्याखेरीज अद्याप नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. परिणामी कोट्यवधींचा खर्च करून देखील नळधारकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
. बल्लारपूर तालुक्यातील ग्रीड पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी, म्हणून ८ कोटी २४ लक्ष १४ हजार रुपये मंजूर निधीतून वितरण व्यवस्था पूर्ण करण्यासाठी ५ कोटी ८१ लक्ष ४९ हजार रुपये प्रस्तावित केले आहे. घरगुती नळ जोडणी करून घेण्यासाठी १ कोटी ४४ लक्ष ९४ हजार रुपये दिले आहे. किरकोळ कामकाजावर १0 लक्ष रुपये, तर इतर कामकाजावर ८0 लक्ष २0 हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन झाले आहे. ही ग्रीड पाणी पुरवठा योजना १४ जून २0२3 पर्यंत पूर्ण करून देण्याचा आदेश संबंधित कंत्राटदारांनी मान्य केले. मात्र, धोरणकर्त्यांच्या निष्काळजीपणा ग्रीड पाणी पुरवठा योजनेला भोवल्याचे दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यातील महत्वकांक्षी प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा ग्रीड पाणी पुरवठा योजना केव्हा सुरु होणार आहे. १८ गावातील नागरिकांना हर घर, नल से जल पिण्याचे पाणी केव्हा येणार, याची प्रतिक्षा आहे.


