पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
जिवती : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील शेणगाव येथे खुलेआम अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत आहे. या अवैध दारू विक्रीमुळे लहान मुलेही दारूच्या आहारी गेली असून गावातील शांतता भंग झाली आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
. मौजा शेणगाव येथे तीन ते चार देशी विदेशी दारूचे दुकाने थाटली आहे. एवढेच नाही तर चक्क येथे बैठक व्यवस्था पण आहे. या दुकानाच्या मागे दारूच्या खाली बॉटलांचा खच साचला आहे. हे सगळं खुलेआम पणे सुरु आहे. हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे हे मात्र त्यांनाच ठाऊक. पण याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सर्वत्र कारवाईचा बडगा सुरु आहे. मात्र
जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेले जिवती तालुक्यातील शेणगाव गावाकडे कुणाचेही लक्ष जात नाही हे मात्र न समजणारे कोडे आहे.
. या खुलेआम होत असलेल्या अवैध दारुविक्रीला गावातील महिलांनी अनेकदा विरोध केला. परंतु दारू विक्रेत्यांनी पोलीसांना हाताशी धरून ठेवले आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शोध पथकांची टीम येणार असल्याची माहिती या अवैध दारुविक्रेत्यांना अगोदरच माहिती होतात. त्यामुळे दारुविक्रेते अलर्ट होऊन दुकानें बंद करून पसार होतात. गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री मुळे आता लहान शाळकरी मुले ही व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे तर यामुळे घरगुती कलह व चोरीच्या घटना वाढत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व स्थानिक गुन्हे शोध पथकांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तर खुलेआम विक्री करणाऱ्या दारुविक्रेत्यांवर व त्यांना साथ देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाही करण्याची मागणी गावकरी करीत आहे.


