नागरिक उकाड्याने त्रस्त ; महावितरणचा लपंडाव
चिमूर : तालुक्यातील खडसंगी परिसरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. वातावरणात उकाडा पण प्रचंड आहे. यातच महवितरणच्या वेळी अवेळी एक – एक तास बंद असणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
. चिमुर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर खडसंगी हे गाव आहे. येथे आठवडी बाजार भरल्या जातो. त्यामुळे परिसरातील खेड्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. तर लागूनच ताडोबा जंगल असल्याने जंगल सफारीसाठी येणारे पर्यटक खडसंगी येथील रिसोडवर मुक्कामाने थांबतात. मात्र विजेच्या लपंडावाचा फटका सुद्धा त्यांना बसत आहे. या सर्व बाबींचा विचार करून व वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्या लक्षात घेत खडसंगी येथे वीज वितरण उपकेंद्र निर्माण करण्यात आले. या निर्माण कार्याला अनेक वर्ष लोटूनही विजेच्या समस्या कायमच आहेत. यामुळे विजेवर आधारित व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. तर लहान बालकांना व नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले हे वीज वितरण उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे.


