वासेरा येथील घटना ; कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
सिंदेवाही : तालुक्यातील वासेरा येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क पाच बालकांचा चावा घेऊन त्यांना गंभीररित्या जखमी केले असल्याने उपरार्थ त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी मध्ये संदीप रवि चुंने (२८), जोजो विनोद पाटील (७), अमन घनश्याम मेश्राम (७), मृणय मनोज रामटेके (८), पिंकी रेवणाथ मसराम (७), सर्वजण रा. वासेरा अशी जखमींचे नावे आहेत.
. वासेरा गावात सध्या मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. गल्लोगल्लीत खाज झालेले मोकाट कुत्रे नेहमी फिरत असतात. दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास एक पिसाळलेला कुत्रा अचानक बालकांच्या अंगावर धावून जावू लागला त्यामुळे बाहेर खेळत असलेली निरागस बालके इकडे तिकडे सैरावरा पळत सुटले. मात्र त्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीत आलेल्या एका तरुणाला आणि चार निरागस बालकांना कुत्र्याने अक्षरशः ओरबळून काढले. तर काहीं बालकांच्या हातापायाला चावा घेऊन लचका तोडला.
. घटनेची माहिती लगेच गावात वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा अनेक तरुणानी हातात काठ्या घेऊन दिसेल त्या कुत्र्यांना गावाबाहेर हाकलून लावले. व जखमींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्याची लस उपलब्ध नसल्याने सर्व जखमींना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. सध्या सर्व जखमींची तब्येत बरी असून उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
. दरम्यान गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात संचारबंदी लागली असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ग्राम पंचायत प्रशासनाने गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून या निमित्ताने करण्यात येत आहे.


