१६ एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा !
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
कोळसा खाणी, वीज केंद्र आणि नद्यांच्या प्रदूषणाची होणार प्रत्यक्ष पाहणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजा मुंडे येत्या गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे आणि संसदीय आयुधांचा प्रभावी वापर केल्यामुळे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
मुनगंटीवार यांचा ऐतिहासिक पाठपुरावा
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) आणि वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणाने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर आ. मुनगंटीवार यांनी ११ मार्च २०२५ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा घडवून आणली होती. त्यानंतरही २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल वॉशरीजमधील अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आणि २४ मार्च २०२६ रोजी झरपट व इरई नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा विषय त्यांनी लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत पर्यावरण मंत्र्यांनी स्वतः जिल्ह्याची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते.
दौऱ्याचे प्रमुख थांबे आणि पाहणी
ना. पंकजा मुंडे आपल्या दौऱ्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS), दुर्गापूर येथील हवेतील प्रदूषण आणि राखेच्या विल्हेवाटीची पाहणी, बेलसणी कोल वॉशरीज कोळसा धुण्याच्या प्रक्रियेतील अनियमितता आणि जलप्रदूषणाची तपासणी, अल्ट्राटेक सिमेंट, गडचांदूर सिमेंट प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांचा आढावा, भिवापूर परिसर येथील नदी प्रदूषणाची स्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळीच सूचना दिल्या जातील. या ठिकाणांना भेटी देऊन प्रदूषणाची सद्यस्थिती जाणून घेतील.
नियोजन भवन येथे महत्त्वाची बैठक
क्षेत्रीय पाहणीनंतर चंद्रपूरच्या नियोजन भवन येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केवळ प्रदूषणावरच नव्हे, तर प्रदूषणाचा फटका बसलेल्या पशुपालकांच्या अडचणींवरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील मान्यवरांशी संवाद साधून उपाययोजनांची पुढील दिशा निश्चित केली जाईल.
ठोस निर्णयाची अपेक्षा
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे होत असलेल्या या दौऱ्याकडून चंद्रपूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यामुळे जिल्ह्याच्या पर्यावरणीय प्रश्नांवर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


