१० हजार क्विंटल कापूस जळून खाक
रवीकमल कोटेक्समधील दुर्घटना
अवघ्या अर्ध्या तासात ८ ते १० कोटींचे नुकसान
सुदैवाने जीवितहानी टळली
वरोरा : तालुक्यापासून अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील ‘रवीकमल कोटेक्स’ या कापूस जिनिंग प्रकल्पाला सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने अवघ्या अर्ध्या तासात रौद्ररूप धारण केले, ज्यामध्ये १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत जिनिंगचे सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी जिनिंगमध्ये कापूस डोजरच्या साहाय्याने टाकण्याचे काम सुरू होते. याच प्रक्रियेदरम्यान अचानक ठिणगी उडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि वाऱ्याचा वेग असल्याने ही आग वेगाने पसरली. पाहता पाहता कापसाच्या ढिगाऱ्यांनी पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. या आगीत कापसासोबतच एक डोजर ट्रॅक्टर आणि इतर महत्त्वाचे साहित्यही पूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे.
![]()
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषद आणि परिसरातील औद्योगिक प्रकल्पांच्या एकूण ८ अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कापसाच्या मोठ्या ढिगाऱ्यामुळे आग आतपर्यंत धगधगत होती, परिणामी आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने, अग्निशमन दलाने शिताफीने आग आटोक्यात आणल्यामुळे गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गाठी आणि बाहेर उभे असलेले कापसाचे ट्रक आगीपासून वाचवण्यात यश आले.
अधिकारी घटनास्थळी दाखल
आगीच्या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार योगेश कोटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, उन्हाळ्यामुळे शेतात कचरा जाळताना उडालेली ठिणगी कारणीभूत असावी असा संशय व्यक्त होत आहे.
. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सुदैवाने, या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.


