शाळा-महाविद्यालये आता फक्त सकाळी ११ वाजेपर्यंतच!
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आदेश
वाढत्या उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्याने, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालये आता केवळ सकाळच्या सत्रातच भरविली जाणार असून, ती जास्तीत जास्त सकाळी ११ वाजेपर्यंत सोडण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
. मार्च महिन्यापासूनच चंद्रपुरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबत आधीच सूचित करण्यात आले होते. मात्र, आता उष्णतेची लाट आणि उष्माघाताचा (सन स्ट्रोक) धोका वाढल्याने जिल्हा प्रशासनाने वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हात विद्यार्थ्यांना घरी जाताना त्रास होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी स्पष्ट केले आहे की, सर्व शैक्षणिक संस्थांनी या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


