Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोऱ्यात स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरने घेतला पेट

वरोऱ्यात स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरने घेतला पेट

16

शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

महिलेच्या पायाला किरकोळ इजा

वरोरा : शहरातील साई नगर परिसरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. जयंत मोतीराम दातारकर यांच्या घरी ही घटना घडली असून, शेजाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात रात्रीचा स्वयंपाक करत होत्या. अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने घरात एकच खळबळ उडाली. आगीचे स्वरूप पाहून दातारकर कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावून आले.

शेजाऱ्यांचे धाडस आणि प्रसंगावधान
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेजाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता जळत असलेला सिलेंडर तातडीने घराबाहेर काढला. सुरक्षित अंतरावर नेऊन तो सिलेंडर रेतीच्या ढिगाऱ्यावर टाकण्यात आला. काही वेळातच सिलेंडरमधील गॅस पूर्णपणे बाहेर पडल्याने संभाव्य स्फोट आणि मोठी दुर्घटना टळली. नागरिकांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.      या घटनेत रेखा दातारकर यांच्या पायाला किरकोळ भाजल्याने त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

error: Content is protected !!