Home चंद्रपुर जिल्हा विशेष नंदोरी परिसरात चोरांचा सुळसुळाट

नंदोरी परिसरात चोरांचा सुळसुळाट

3

वरोरा पोलिसांकडून यवतमाळच्या तीन सराईत चोरांना अटक

खंडाळा रिठ शिवारातील १० शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल लंपास

शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपी जाळ्यात

चंद्रपूर : वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भद्रावती तालुक्यातील नंदोरी आणि खंडाळा रिठ परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्यापासून तर थेट वाहनांच्या बॅटरीपर्यंत हात साफ करणाऱ्या या टोळीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक घटनेची रीतसर तक्रार देऊनही वरोरा पोलीस प्रशासन केवळ ‘कागदी घोडे’ नाचवत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. शनिवारी रात्री शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अखेर यवतमाळ जिल्ह्यातील तीन सराईत चोरटे जाळ्यात अडकले.

ताज्या घटनेत १० शेतकऱ्यांचे केबल चोरीला
शुक्रवार, दि. १७ मे च्या मध्यरात्री खंडाळा रिठ शिवारात चोरट्यांनी तांडव केले. भानूदास ढवस, चंदू पुनवटकर, विक्रम जीवतोडे, आकाश मोंढे, मनीष गोंडे, निखिल ताजने यांच्यासह १० शेतकऱ्यांच्या मोटारीचे केबल कापून नेले. तसेच विठ्ठल गानफाडे यांच्या शेतातील बंड्याचे कुलूप फोडून घरगुती साहित्य आणि अवजारे चोरून नेली. या सातत्यपूर्ण घटनांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांची सतर्कता : संशयितांनी दिली उडवाउडवीची उत्तरे
शनिवारी रात्री १०:३० च्या सुमारास गुरुदेव हरणे व कैलास ढवस शेतात जात असताना त्यांना नंदोरी बस स्टॉपवर तीन संशयित व्यक्ती आढळले. विचारणा केली असता, तिघांनीही वेगवेगळी कारणे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्याने गुरुदेव हरणे व कैलास ढवस यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांना बोलावून वरोरा पोलिसांना पाचारण केले.

यवतमाळच्या टोळीकडून गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नंदू लोणसावळे, बाजीराव येरणे आणि सुनील लोणसावळे, रा. सालेभट्टी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ यांनी चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे MH-29-CG-0992 क्रमांकाची दुचाकी आढळली. या टोळीचा एखादा मुख्य सूत्रधार असून त्यांनी चोरीचा माल कुठे तरी साठवून ठेवला असावा, असा दाट संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महिनाभरापासून चोऱ्यांचे सत्र : पोलीस प्रशासन निद्रिस्त ?
नंदोरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एकापाठोपाठ एक चोऱ्यांच्या घटना घडत आहेत, मात्र पोलीस प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे. १ एप्रिल २०२६ रोजी प्रशांत लांबट यांच्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी लंपास झाल्या. २९ मार्चला गुरुदेव हरणे यांच्या शेतातील सोलर प्लेट्स २५ हजारांचे साहित्य चोरीला गेले, तर त्याच रात्री आदित्य हरणे यांचेही मोठे नुकसान झाले. २४ मार्चला बोरवेलचे केबल कापून ते जाळून तांबे काढण्याचे धाडस चोरट्यांनी केले. २० मार्चला भररस्त्यात मोबाईल चोरीची घटना घडली. या सर्व प्रकरणांत वरोरा पोलिसांत तक्रारी दाखल असूनही अद्याप एकही चोरटा गजाआड झाला नव्हता. “शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून साहित्य जमवतो आणि चोरटे ते सहज लंपास करतात; मग पोलीस करतात काय ?” असा संतप्त सवाल आता विचारला जात असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

.       वरोरा पोलिसांनी आता तरी गांभीर्याने तपास करून या टोळीचा पर्दाफाश करावा आणि शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले साहित्य परत मिळवून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!