परसोडा-खैरगाववासीयांचा जीव धोक्यात !
रस्त्याची उंची १०-१२ फूट वाढल्याने शेतकऱ्यांची ‘तारावरची कसरत’
अपघाताची टांगती तलवार
वरोरा : वरोरा-चिमूर या नवीन महामार्गाची निर्मिती परसोडा आणि खैरगाव येथील ग्रामस्थांसाठी सोयीची ठरण्याऐवजी मोठी डोकेदुखी ठरत आहे. महामार्गाची उंची गावाकडे जाणाऱ्या मूळ रस्त्यापेक्षा तब्बल १० ते १२ फूट जास्त झाल्याने ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, येथे भविष्यात मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
परसोडा आणि खैरगाव ही दोन्ही गावे एकाच गटग्रामपंचायत अंतर्गत येतात. महामार्गाची उंची प्रचंड वाढल्याने गावाकडून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना महामार्गावरील वेगवान वाहने वेळेवर दिसत नाहीत. परिणामी, वाहनधारक थेट रस्त्यावर आल्यावर भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची परवड:
या समस्येचा सर्वाधिक फटका शेतकरी बांधवांना बसत आहे. आपली बैलगाडी या उंच चढणीवर चढवताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. बैलगाडी महामार्गावर चढवण्यापूर्वी एका व्यक्तीला आधी महामार्गावर जाऊन कोठून वाहन येत नाही ना, याची शहानिशा करावी लागते. तिथून इशारा मिळाल्यावरच बैलगाडी वर चढवली जाते. या ‘तारेवरच्या कसरती’मुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा चढ-उतार योग्य पद्धतीने दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी केली आहे. भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.


