Home सामाजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

24

शांतता समितीच्या बैठकीत नियोजनाचा आढावा

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

रॅली मार्गावरील खड्डे बुजविणार, पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांचेही नियोजन

चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उत्सव उत्साहात पार पडावा, यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीत प्रशासकीय अधिकारी आणि समिती सदस्यांनी विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

.      यावेळी मंचावर मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलिस अधीक्षक गौरव कायंदे पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासकीय तयारी आणि नियोजन
मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी माहिती दिली की, जयंतीनिमित्त शहरात निघणाऱ्या रॅलीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तसेच सर्व वॉर्डांमध्ये विशेष साफसफाई मोहीम राबवली जाईल. मुख्य पुतळा परिसरात अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता राखण्याचे आवाहन:
अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. वाहतुकीचे नियोजन चोख ठेवण्याच्या सूचना सर्व पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी चंद्रपूरच्या शांतताप्रिय परंपरेचा उल्लेख करत, हा वारसा जपण्यासाठी समिती सदस्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, रात्रीच्या वेळी पुतळ्यावर चांगला प्रकाश पडण्यासाठी हॅलोजन लावावे, उन्हाचा तडाखा पाहता रुग्णवाहिका तैनात असावी, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असावी, मनपाने अनधिकृत बॅनरवर कारवाई करावी, अफवा पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी, लटकलेल्या विद्युत तारांचा योग्य बंदोबस्त करावा, पुतळ्याजवळील निर्माल्याचे वेळोवेळी साफसफाई करावी, रॅलीच्या मार्गाचे योग्य नियोजन व्हावे.

.      या बैठकीमुळे आगामी भीम जयंती उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!