Home सामाजिक चंद्रपूर जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

चंद्रपूर जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

19

जिल्हास्तरीय कार्यशाळेत नियोजनाचा आढावा

राज्यस्तरावर ५ कोटींचे बक्षीस

लोकसहभागातून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांचे आवाहन

चंद्रपूर : आरोग्य हा विषय नागरिकांच्या जीवनशैलीचा केंद्रबिंदू व्हावा आणि ग्रामीण भागात आरोग्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

.      कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, माता बाल संगोपन अधिकारी मोहनीश गिरी प्रामुख्याने उपस्थित होते.

१ एप्रिल २०२६ पासून वर्षभर अंमलबजावणी
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले की, “१ एप्रिल २०२६ पासून हे अभियान सुरू झाले असून ते वर्षभर चालणार आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’च्या धर्तीवर आता आरोग्य विभागाने हे पाऊल उचलले आहे. गावस्तरावरील सर्व यंत्रणा आणि लोकांचा सहभाग या मोहिमेच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आरोग्य संपन्न करू.”

तुल्यबळ स्पर्धा आणि कोट्यवधींची बक्षिसे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी प्रास्ताविकात अभियानाच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी राज्यस्तरावर ५ कोटी, विभागीय स्तरावर ३ कोटी, तर जिल्हास्तरावर २ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे मूल्यमापन केवळ कागदोपत्री न होता पुराव्यासह केले जाणार आहे.

नियमित आढावा आणि जनजागृती
अभियानाच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर दर दोन महिन्यांनी, तर ग्राम आणि तालुकास्तरावर दरमहा आढावा घेतला जाईल. या मोहिमेमध्ये संसर्गजन्य, असंसर्गजन्य, जलजन्य आणि कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. यात आंतरविभागीय समन्वय आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

.       या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मोहनीश गिरी यांनी केले.

error: Content is protected !!