Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापुरात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात

विसापुरात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात

71

चालकाचा जागीच मृत्यू

वळण घेताना काळाचा घाला

नांगरणीसाठी जाताना घडली दुर्दैवी घटना

विसापूर गावावर दुःखाचे सावट

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या एका अनुभवी चालकाचा ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण विसापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, विसापूर येथील तुकडोजी चौक भागातील रहिवासी रामचंद्र गोविंदा गिरडकर (५८) हे विजय गणपती गिरडकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कार्यरत होते. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने, बुधवारी दुपारी १:४५ च्या सुमारास रामचंद्र हे ट्रॅक्टर घेऊन शेतशिवारात नांगरणीच्या कामासाठी जात होते.

.      एका शेतकऱ्याच्या शेताजवळ असलेल्या वळण मार्गावर ट्रॅक्टर वळवत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टर थेट अंगावर पडल्याने रामचंद्र गिरडकर हे त्याच्याखाली गंभीररीत्या दबले गेले.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

.      रामचंद्र गिरडकर यांच्या निधनाने विसापूर गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार असून, कुटुंबाचा आधार हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!