जि.प. उ.प्रा. शाळा नंदोरी येथे ७ वीच्या विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी निरोप
७ वर्षांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाच्या उंबरठ्यावर
‘माणूस’ बनून समाजाची सेवा करा : शिक्षकांचा मोलाचा संदेश
शिक्षकांनी फुंकले यशाचे स्फुरण
नव्या वाटा शोधण्यासाठी विद्यार्थी सज्ज
चंद्रपूर : ज्या बोबड्या बोलांसोबत शाळेच्या परिसरात पहिले पाऊल ठेवले होते, कधी नाकाला लागलेला शेंबूड तर कधी गालावर ओघळणारी आसवे पुसत आईच्या हाताला धरून शाळेत येणारी ती निरागस मुले आज सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर माध्यमिक शिक्षणाच्या नव्या क्षितिजाकडे झेपावण्यासाठी सज्ज झाली आहेत. भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी बु. येथे आज दि. ८ एप्रिल २०२६ रोजी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावूक वातावरणात पार पडला. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या थोरल्या भावंडांना सन्मानाने निरोप दिला.
बालविश्वाचा साचेबद्ध आकार
शाळेत प्रवेश घेताना या मुलांकडे कोणतेही नियम किंवा शिस्त नव्हती, केवळ खेळणे आणि मौज-मस्ती यातच त्यांचे विश्व सामावलेले होते. मात्र, या टुमदार शाळेच्या पहिल्या वर्गातून सुरू झालेला हा प्रवास आज एका जबाबदार वळणावर येऊन पोहोचला आहे. शिक्षकांच्या प्रेमळ आणि मायाळू स्पर्शाने या बालमनावर संस्कारांचे पैलू पाडले. पालकांनी विश्वासाने सोपवलेले हे बालपण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिस्त, भाषा आणि अंकगणनाच्या सरावातून बहरून निघाले.
७ वर्षांची तपस्या आणि नव्या आव्हानांची तयारी
गेल्या सात वर्षांत वर्गशिक्षकांसह इतर सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. आज ७ वी उत्तीर्ण होऊन माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरच्या जगात जाताना हे विद्यार्थी कोणत्याही आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम झाले आहेत. प्राथमिक शिक्षणात रुतलेल्या भक्कम पायाच्या आधाराने हे विद्यार्थी यशाच्या नवनव्या शिड्या चढतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गुरुजनांचा हृदयस्पर्शी संदेश
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. “बाळांनो, भविष्यात तुम्ही खूप मोठे व्हा, यशाची शिखरे सर करा, पण आपले आई-वडील, गुरुजन आणि ज्या मातीत आपण वाढलो, तिच्याशी सदैव इमान राखा. शैक्षणिक प्रवासात कधी अपयश आले तरी खचून जाऊ नका; या शाळेने दिलेली ‘माणुसकी’ आणि ‘संस्कारांची तिजोरी’ तुम्हाला नेहमी मार्ग दाखवेल,” असे भावूक उद्गार यावेळी काढण्यात आले. आपल्या शाळेला भविष्यात अधिक समृद्ध करण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टीने हातभार लावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
. या निरोप समारंभाने संपूर्ण शाळा परिसर भावूक झाला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर शिक्षकांनी “बिनधास्त पुढे जात रहा” असा आशीर्वाद देत या पाखरांना पुढील प्रवासासाठी मुख्याध्यापक विजय सातपुते, विषय शिक्षक पंडित लोंढे, विजया भोमले व जि. प. उ. प्रा. शाळा, नंदोरी बु च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


