Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोऱ्यात स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांचा ‘बँडबाजा’ मोर्चा

वरोऱ्यात स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांचा ‘बँडबाजा’ मोर्चा

159

डोक्यावर घमिले घेऊन प्रशासनाचा निषेध

दोन महिन्यांपासून शहर अस्वच्छ

अनावश्यक ‘डेकोरेटिव्ह’ दिव्यांच्या निविदेलाही तीव्र विरोध

वरोरा : शहरातील गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळीत झालेली स्वच्छता आणि नागरी समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) नगरसेवकांनी अनोखे आंदोलन छेडले. हातात झाडू, फावडे आणि डोक्यावर घमिले घेत, बँडबाजाच्या गजरात नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन नगरसेवकांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी हे आंदोलन पार पडले.

नेमका प्रकार काय ? 
वरोरा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सूचना देऊनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने अखेर विरोधी गटातील नगरसेवक रस्त्यावर उतरले. नगरसेविका लिना संजय गयनेवार यांच्या निवासस्थानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बँडबाजा आणि मागे डोक्यावर टोपल्या घेऊन चालणारे नगरसेवक यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले होते.

शासन निधीच्या अपव्ययाचा आरोप
यावेळी नगरसेवकांनी केवळ स्वच्छतेचाच नव्हे तर चुकीच्या कामांच्या निविदेचाही मुद्दा लावून धरला. दलित वस्ती सुधार निधीतून अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिल या मार्गावर ‘डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट’ बसविण्याची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, या मार्गावर आधीच पथदिवे सुस्थितीत असताना पुन्हा नवीन दिवे बसवणे हा शासन निधीचा अपव्यय असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. संबंधित भागात नाली, रस्ते आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांची वानवा असताना अशा अनावश्यक कामांना प्राधान्य देणे संशयास्पद असून ही निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलकांचा सहभाग
भाजपचे गटनेते अक्षय भिक्दरे आणि शिवसेना (शिंदे गट) गटनेते खेमराज कुरेकार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये माजी नगरसेवक राजेश महाजन, नगरसेविका लता हिवरकर, लिना संजय गयनेवार, मनीषा दानव, शालिनी आत्राम, वर्षा पिसाळ, सीमा तडस, नुपुर तेला यांच्यासह प्रवीण चिमूरकर, कुणाल रुयारकर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात पाणीपुरवठाही विस्कळीत झाला असून प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!