गावाच्या वेशीवरच ग्राहकांनी ठोकला ठिय्या
टंचाईमुळे वितरणाचा बोजवारा
चंद्रपूर : सध्या जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, ग्रामीण भागातील नागरिक गॅस मिळवण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुरवठा विस्कळीत झाल्याने एजन्सीच्या गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत असून, गाडी दिसताच ग्राहकांच्या उड्या पडत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
. या टंचाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. अनेक गावांमध्ये सिलिंडर वेळेवर पोहोचत नसल्याने नागरिक वरोरा आणि भद्रावती येथील गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारत आहेत. बुधवारी वरोरा येथील एका एजन्सीची गाडी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान नंदोरी गावाच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र, ही गाडी गावात पोहोचण्यापूर्वीच ग्राहकांनी गावाच्या सुरवातीला (वेशीवर) मोठी गर्दी केली होती व नागरिक ताटकळत रांगेत उभे होते.
. गावात गाडी शिरल्यास होणारा गोंधळ टाळण्यासाठी चालकाने गाडी रस्त्यावरच थांबवून वितरण सुरू केले. यावेळी सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी ओढाताण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांना खरोखरच तातडीची गरज आहे अशा गरजूंसोबतच, घरी साठा उपलब्ध असलेल्या नागरिकांनीही गर्दीत घुसून सिलिंडर पदरात पाडून घेतले.
. गॅस वितरणाची ही विस्कळीत आणि अनियंत्रित पद्धत थांबवून प्रशासनाने घरपोच आणि सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता ग्राहकांकडून जोर धरत आहे.


