खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडे निधीची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) क्षेत्राच्या कायापालटासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे. या भागातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
. भद्रावती परिसरात ‘न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ग्रेटा एनर्जी’ हे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकारणार आहेत. कोळसा गॅसीफिकेशन आणि कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानावर आधारित हे प्रकल्प स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने मोठी क्रांती घडवून आणणार आहेत. मात्र, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सध्या या क्षेत्रात दर्जेदार रस्ते, रोड ओव्हर ब्रिज आणि सक्षम जलवाहिन्यांचा अभाव आहे. या तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पांच्या कामात अडथळे येत असल्याचे खासदार धानोरकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
. या प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हे महत्त्व अधोरेखित करत, केंद्र सरकारच्या ‘क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर फंड’मधून या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
. खासदार धानोरकर यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या विषयावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे भद्रावती MIDC च्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच या भागाचा औद्योगिक कायापालट होण्याची चिन्हे आहेत.


