Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवकाळीचा दणका ! वरोरा-भद्रावती परिसरात पावसाची हजेरी

अवकाळीचा दणका ! वरोरा-भद्रावती परिसरात पावसाची हजेरी

238

बळीराजाची पिके वाचवण्यासाठी मोठी धावपळ

ऐन सुगीच्या हंगामात निसर्गाचा कोप

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती

चंद्रपूर : जिल्ह्यात आज वातावरणाने अचानक कूस बदलली असून दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी २:३० च्या सुमारास वरोरा आणि भद्रावती तालुक्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६:४० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे सुटल्याने अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. ऐन सुगीच्या हंगामात आलेल्या या संकटामुळे काढणीला आलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.

हाताशी आलेला घास हिरावण्याची भीती

सध्या जिल्ह्यात हरभरा आणि गहू कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतात पिकांचे ढिगारे लावून ठेवलेले असतानाच निसर्गाने कोप केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हाताशी आलेला घास हा अवकाळी पाऊस हिरावून तर नेणार नाही ना, या भीतीचे सावट शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

ताडपत्रीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

पाऊस सुरू होताच कापून ठेवलेला माल सुरक्षित करण्यासाठी शेतकरी ताडपत्री घेऊन शेताकडे धावताना दिसले. माल भिजल्यास दर्जा घसरून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने, भर पावसातही माल वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू असल्याचे विदारक चित्र वरोरा आणि भद्रावती परिसरात पाहायला मिळाले.

error: Content is protected !!