वनसंपदेचे मोठे नुकसान
भद्रावती : शहरातील विजासन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळ असलेल्या ऐतिहासिक भद्रगिरी पर्वताला आज अचानक भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे पर्वतावरील मौल्यवान वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
. मिळालेल्या माहितीनुसार, विजासन प्रकल्प परिसराकडून आगीची सुरुवात झाली आणि वाऱ्यामुळे ती वेगाने भद्रगिरी पर्वताच्या दिशेने पसरली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पर्वताच्या काही भागाला आगीने पूर्णपणे वेढले होते. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ भाग असल्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या आगीमुळे पर्वतावरील वृक्ष आणि नैसर्गिक अधिवासाची हानी झाली असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


