आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
सांस्कृतिक कार्य विभागाकडून २५ लाखांचा निधी मंजूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या आणि गोंडवानाच्या ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव आता चंद्रपुरात शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरा होणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले असून, राज्य शासनाने या उत्सवासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि गौरव
राजमाता राणी हिराई यांच्या दूरदृष्टीपूर्ण कारभारामुळे चंद्रपूर शहराला वैभवशाली ओळख प्राप्त झाली. माता महाकाली मंदिर, राजा बिरशहा यांची समाधी अशा ऐतिहासिक वास्तू उभारून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध केले. या देदीप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि चंद्रपूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, या हेतूने ‘राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती’, चांदागडचे अध्यक्ष शांताराम उईके यांनी यासंदर्भात निधीची मागणी केली होती.
. या मागणीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना लेखी पत्राद्वारे निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत राज्य शासनाने १२ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय काढून राजमाता राणी हिराई जन्मोत्सवासाठी निधी मंजूर केला आहे.
असा होणार सोहळा: संस्कृती, कला आणि परंपरेचा संगम
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव, सोमेश्वर मंदिराजवळ हा भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ औपचारिक नसून ते संस्कृती, कला आणि परंपरेचे दर्शन घडवणारे असेल. कार्यक्रमात संगीत, वादन आणि नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच, याठिकाणी वन उत्पादन आणि हस्तकला प्रदर्शनीचेही विशेष आयोजन करण्यात येणार आहे.
स्थानिक कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
आमदार मुनगंटीवार यांच्या या पुढाकारामुळे गोंडकालीन संस्कृतीला आणि स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हा निर्णय चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, यामुळे राजमाता राणी हिराई यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी भावना आता जनसामान्यातून व्यक्त होत आहे.


