Home सामाजिक चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी ३ अर्ज दाखल

चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी ३ अर्ज दाखल

211

शिवसेने (उबाठा) तर्फे मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंत देशमुख रिंगणात

१६ मार्चला होणार फैसला

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शुक्रवारी (१३ मार्च) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आता या पदासाठी चुरस वाढली असून १६ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.      प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी दोन संचात आपले अर्ज दाखल केले आहेत. तर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा एक अर्ज प्राप्त झाला आहे.

.      यापूर्वी ११ व १२ मार्च रोजी कोरे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामध्ये एकूण ७ इच्छुकांनी अर्जांची उचल केली होती. मात्र, प्रत्यक्ष रिंगणात दोन पक्षांचे उमेदवार आमनेसामने ठाकले आहेत.

.     सोमवार, १६ मार्च रोजी महानगरपालिकेत या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या सुरुवातीला अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. जर दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले, तर मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर तातडीने निकाल घोषित केला जाईल.

error: Content is protected !!