अवैध गौण खनिज भरारी पथकाची कारवाई
भद्रावती : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कंबर कसली असून, भरारी पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या आदेशानुसार वरोरा, भद्रावती तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबविली जात असून या भरारी पथकाच्या माध्यमातून दररोज कारवाई होत असल्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मंगळवारी दि. १० मार्च रोजी पहाटे ६:१५ वाजताच्या सुमारास मौजा पारोधी घाट परिसरात भरारी पथकाने पाळत ठेवली होती. यावेळी अवैध रेती घेऊन जाणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. या वाहनातून सुमारे २ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. तर दुसरी कारवाई भद्रावती शहरातील जुना बस स्टॉप परिसरात पहाटे ४:२५ वाजता करण्यात आली. यावेळी MH-34 BV-0121 क्रमांकाचा ट्रॅक्टर १ ब्रास रेतीची अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आला.
. अवैध गौण खनिज भरारी पथकाने ही धडक कारवाई केली असून, जप्त केलेली दोन्ही वाहने आणि त्यातील रेतीचा साठा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र राहणार असल्याची माहिती भद्रावती चे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी दिली.


