हायवा-ट्रकच्या भीषण धडकेत चालक गंभीर
एकाच महिन्यात पाचवा अपघात
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानोरा वळण आता मृत्यूचे द्वार बनू लागले आहे. मंगळवारी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास येथे हायवा आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात हायवा चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास विस्कळीत झाली होती.
. मिळालेल्या माहितीनुसार, बांबूने भरलेला ट्रक (क्र. MH 34 BZ 1117) वरोराकडून भद्रावतीकडे चुकीच्या दिशेने (रॉग साईड) येत होता. याच वेळी वरोराकडे जाणाऱ्या हायवा (क्र. MH 49 BZ 7482) सोबत त्याची मानोरा वळणावर समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की, हायवा चालक विनोद जुनघरे (४२, रा. सुमठाना) हे स्टेअरिंगमध्येच अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
. अपघातामुळे ट्रकचा टायर फुटला आणि दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध अडकली. यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दीड तासानंतर वाहतूक सुरळीत केली. जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
. मानोरा वळणावर गेल्या एका महिन्यात झालेला हा पाचवा अपघात आहे. यापूर्वी झालेल्या अपघातांत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासन या ठिकाणी उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.


