खासदार प्रतिभा धानोरकर यांची स्वपक्षातील ‘हितशत्रूं’वर तोफ
चंद्रपुरातील स्नेहमिलन सोहळ्यात व्यक्त केली खंत
चंद्रपूर : “महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास टाकला. मात्र, सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन,” अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
. चंद्रपूर येथे खासदार धानोरकर यांच्या पुढाकाराने आयोजित काँग्रेस व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांच्या ‘स्नेहमिलन सोहळ्यात’ त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेणेकर, शहर अध्यक्ष संतोष लहामंगे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
![]()
स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे नुकसान
खासदार धानोरकर पुढे म्हणाल्या की, “दिल्लीत प्रियांका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात,” असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
नगरसेवकांनी प्रखर विरोधी पक्षाची भूमिका मांडावी – विनोद दत्तात्रय
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेचे कामकाज सखोलपणे समजून घेण्याचे आवाहन केले. “महानगरपालिकेला सध्या भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ही कीड दूर करण्यासाठी आपल्याला सभागृहात एक प्रखर आणि सतर्क विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागेल,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
धानोरकरांच्या नेतृत्वात काँग्रेसची मोठी झेप – पप्पू देशमुख
जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “खासदारांच्या प्रभावी पुढाकारामुळेच आज महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या १२ वरून थेट २७ पर्यंत पोहोचली आहे. हे त्यांच्या नेतृत्वाचे यश असून, भविष्यातही आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी काम करू.”
. या स्नेहमिलन सोहळ्याचे सूत्रसंचालन रामकृष्ण कोंड्रा यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


