Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा पोलीस दलात ‘हायव्होल्टेज’ ड्रामा !

वरोरा पोलीस दलात ‘हायव्होल्टेज’ ड्रामा !

327

पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडेंची तडकाफडकी उचलबांगडी

पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी तातडीने स्वीकारला पदभार

शुक्रवारी अचानक धडकले आदेश अन् थेट मुख्यालयाचा रस्ता

बदली की ‘शिक्षा’ ? वरोऱ्यात चर्चांना उधाण

वरोरा : वरोरा पोलीस वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आदेश येताच तांबडे यांना पदभार सोडावा लागला असून त्यांच्या जागी वर्ध्याहून आलेले पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी तातडीने पदभार स्वीकारला आहे.

भूतकाळातील घटनांचा संदर्भ ?
३० जून २०२४ रोजी पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या निष्काळजीपणामुळे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते, तर १ जुलै २०२४ रोजी तत्कालीन ठाणेदार अमोल काचोरे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी कोरपणा येथून अजिंक्य तांबडे यांची वर्णी लागली होती. मात्र, तांबडे यांचा कार्यकाळ जेमतेम काही वर्ष उलटत नाही तोच त्यांनाही आता तडकाफडकी मुख्यालयाचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

काय आहे बदलीचे गूढ ?
नेहमीच्या प्रशासकीय बदल्या या नियोजित असतात, मात्र तांबडे यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अत्यंत नाट्यमय ठरला. शुक्रवारी (ता. २७) अचानक हे आदेश धडकले आणि तांबडे यांना तडकाफडकी ठाणे सोडण्यास सांगण्यात आले. तांबडे यांचा कार्यकाळ सुरू असतानाच अशा प्रकारे ‘अचानक’ मुख्यालयाचा रस्ता दाखवल्याने, ही बदली प्रशासकीय कारणास्तव आहे की यामागे काही छुपे ‘गौडबंगाल’ आहे, यावरून पोलीस वर्तुळात आणि शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

नवे ठाणेदार सोनटक्के ‘ॲक्शन मोड’मध्ये
तांबडे यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी आजपासूनच आपल्या कार्याची सूत्रे हाती घेतली आहेत. वरोरा पोलीस ठाण्याच्या शांत वातावरणात या बदलीच्या बातमीने चांगलीच खळबळ माजली आहे. तांबडे यांची बदली नेमकी कोणत्या प्रकरणामुळे झाली किंवा कोणत्या वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय आला, याबाबत अद्याप अधिकृतरीत्या गुप्तता पाळण्यात येत आहे.

वरोऱ्यात राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय
एका अधिकाऱ्याची अशा प्रकारे आकस्मिक बदली झाल्याने स्थानिक नागरिकांमध्येही तर्कवितर्क लावले जात आहेत. ही बदली केवळ प्रशासकीय कार्याचा एक भाग असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात असले तरी, यामागील खरे कारण शोधण्यासाठी अनेकांचे कान आता पोलीस मुख्यालयाकडे लागले आहेत.

error: Content is protected !!