११ हजार हून अधिक पदांसाठी संधी !
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व युवाशक्ती फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
३५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग
भद्रावती : ग्रामीण आणि वंचित घटकातील सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) सरसावले आहे. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून, नागपूर विभागीय केंद्र आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३५० हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल ११ हजार पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांनी केले आहे.
![]()
या उद्योगांना मिळणार प्राधान्य
मेळाव्यात प्रामुख्याने ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग (CNC मशीनिंग, टूलरूम), फार्मा व केमिकल तसेच फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असेल.
प्रमुख कार्यक्षेत्र आणि प्रशिक्षण
निवड झालेल्या उमेदवारांना कोकण, नाशिक (सातपूर, अंबड, इगतपुरी), पुणे (चाकण, तळेगाव, रांजणगाव), छत्रपती संभाजीनगर (वाळूज, शेंद्रा) आणि कोल्हापूर यांसारख्या औद्योगिक पट्ट्यात काम करण्याची संधी मिळेल. १ ते २ वर्षांच्या अप्रेंटिसशिप किंवा OJT (ऑन जॉब ट्रेनिंग) कालावधीसाठी उमेदवारांना आकर्षक विद्यावेतन (Stipend) देखील दिले जाईल.
पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया
या रोजगार मेळाव्यासाठी उमेदवार किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच पदवी, पदविका (डिप्लोमा) किंवा कोणताही व्यावसायिक कोर्स शिकणारे विद्यार्थी ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, ते या संधीसाठी पात्र आहेत. उमेदवारांची महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. मेळाव्याला येताना सोबत आधार कार्ड, १० वी, १२ वी व पदवी/पदविका गुणपत्रिका, ५ पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक किंवा खाते विवरण आणि अद्ययावत बायोडाटा ही कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे. हा मेळावा ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राव बहादूर डी. लक्ष्मीनारायण बंगला, विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज परिसर, अमरावती रोड, रवी नगर चौक, नागपूर येथे पार पडेल. अधिक माहितीसाठी ९४२२२४७२९५, ८४५९८४३५७६ किंवा ९४०३७७४६३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुकांनी नोंदणीसाठी विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील अभ्यास केंद्रात सह-संयोजक आशिष दुपारे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


