बड्या दुकानदारांचे थेट रस्त्यावरच शोरूम
वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती
भद्रावती : शहरातील वाहतुकीचा कणा असलेला बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वेस्टेशन हा मुख्य रस्ता सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. दोन्ही बाजूने अर्धा रस्ता दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यांनी व्यापल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त होत आहे.
बड्या दुकानदारांची दादागिरी
शहरातील काही मोठ्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक आणि कपड्याच्या दुकानदारांनी फुटपाथ ओलांडून चक्क पांढऱ्या रेषेच्या बाहेर लोखंडी पाईपचे शेड उभे केले आहेत. या दुकानदारांची शोरूम्स सकाळी रस्त्यावरच सजतात आणि थेट रात्री बंद होतात. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासन या बड्या दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी मेहरबान असल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची वाहने उर्वरित रस्त्यावर उभी राहत असल्याने सातपुते मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी चौक या भागात तासनतास वाहतूक कोंडी होत आहे.
नागरिकांची मागणी
“प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांसाठी हक्काची आणि सोयीची जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच नगरपरिषद व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील अनधिकृत शेड हटवावेत,” अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील पांढऱ्या रेषेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.


