Home चंद्रपुर जिल्हा विशेष श्री सिमेंट कंपनीचे बांधकाम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद

श्री सिमेंट कंपनीचे बांधकाम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद

301

३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल

कोंढाळा-येनसा शिवारात तणाव

कंपनी अधिकाऱ्यांच्या धक्काबुक्कीत महिला बेशुद्ध

वरोरा : तालुक्यातील येनसा-कोंढाळा शिवारात श्री सिमेंट कंपनीच्या नियोजित प्रकल्पावरून सोमवारी (दि. १६) मोठा राडा झाला. कंपनी व्यवस्थापनाने प्रलंबित मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त प्रकल्पग्रस्तांनी सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. मागन्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांनी ३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

.       येनसा-कोंढाळा ग्रामपंचायतीने सुरुवातीला कंपनीला ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेत हे प्रमाणपत्र नाकारण्यात आले. जोपर्यंत ग्रामपंचायत नव्याने ना-हरकत प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत कंपनीने बांधकाम करू नये, अशी गावकऱ्यांची ठाम भूमिका आहे. सोमवारी सकाळपासूनच शेकडो प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थ कंपनीच्या परिसरात जमा झाले. यावेळी कंपनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत काम बंद पाडण्यात आले.

.       या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावादीत आणि धक्काबुक्कीत प्रेमीला देविदास गौरकर ही महिला अचानक बेशुद्ध पडली. तिला तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीच्या अरेरावीमुळेच ही वेळ ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

.       शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. “कंपनीने केलेली तक्रार खोटी असून प्रशासनाने लेखी माफी मागावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत एक इंचही बांधकाम करू देणार नाही,” असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे.

error: Content is protected !!