Home चंद्रपुर जिल्हा विशेष नालेसफाईच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक

नालेसफाईच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक

321

वरोरा नगरपरिषदेला ‘ढोल बजावो’ आंदोलनाचा इशारा

कंत्राटदारावर कारवाईसह नियमित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले निवेदन

वरोरा : वरोरा शहरात गेल्या आठवड्यापासून नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेली नालेसफाई अचानक बंद पडल्याने शिवसेना पक्ष आक्रमक झाला आहे. ही नालेसफाई तातडीने सुरू न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर ‘ढोल बजावो’ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना यासंदर्भात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

.      शहरातील नालेसफाई ठप्प झाल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून मच्छरांचे मोठे प्रजनन केंद्र तयार झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या उदासीनतेमुळेच जनतेला हा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या : शहरातील नालेसफाईचे काम तात्काळ युद्धपातळीवर सुरू करावे, सफाईसाठी आवश्यक मजूर आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, कामात हलगर्जी करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, नालेसफाईचे नियमित वेळापत्रक जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी.

.      जर या मागण्या मान्य झाल्या नाही, तर नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तीव्र निदर्शने करत नगरपरिषदेत ढोल बजावो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

.     याप्रसंगी माजी नगरसेवक राजू महाजन, दिनेश यादव, नगरसेवक कुणाल रुयारकर, संदीप मेश्राम, अनिकेत काळे, जावेद शेख, युवासेना शहर प्रमुख चेतन सातपुते, मनीष दोहतरे, सुबोध कुरेकार, आशिष झाडे, विकास गंधारे, राजा थैम यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!