Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा तालुक्यात अवैध दारू आणि रेती तस्करीचा धुमाकूळ

वरोरा तालुक्यात अवैध दारू आणि रेती तस्करीचा धुमाकूळ

373

प्रहार जनशक्ती पक्षाचा ‘जेलभरो’ आंदोलनाचा इशारा

प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम

वरोरा : वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात फोफावलेला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आणि वर्धा नदीसह स्थानिक नाल्यांमधून होणारी बेसुमार रेती तस्करी याविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. या अवैध धंद्यांवर आठ दिवसांत अंकुश न लावल्यास तालुक्यातील हजारो महिलांसह ‘जेलभरो आंदोलन’ करण्याचा इशारा पक्षाचे नेते किशोर डुकरे यांनी दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

पोलीस आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह                                                                                                                      किशोर डुकरे यांनी निवेदनातून प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारूची विक्री उघडपणे सुरू असून, या व्यवसायाला स्थानिक पोलीस बिट कर्मचाऱ्यांचेच अभय लाभत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे गावागावांत गुंडगिरी वाढत असून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, वर्धा नदीवरील लिलाव झालेल्या घाटांवरून नियमावली धाब्यावर बसवून पोकल्यांड मशीनद्वारे रेतीचा उपसा केला जात आहे. स्थानिक नाल्यांमधील रेतीही तस्करांनी फस्त केली असून, पोलीस आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र संघर्ष                                                                                                                                प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर येत्या आठ दिवसांत संबंधित तस्करांवर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई केली नाही, तर पक्ष शांत बसणार नाही. या अन्यायाविरुद्ध तालुक्यातील हजारो पीडित महिलांना रस्त्यावर उतरवून मोठे ‘जेलभरो आंदोलन’ छेडले जाईल. आता प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी हाच शेवटचा पर्याय उरला असल्याचे डुकरे यांनी स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

error: Content is protected !!