शहरात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे ‘ड्राय डे‘चे आदेश
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया शांततेत, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य, बिअर व ताडी विक्री अनुज्ञप्त्या सलग तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.
या तारखांना राहणार मद्यविक्री बंद : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने खालील तीन दिवस मद्यविक्री पूर्णपणे बंद राहील. १४ जानेवारी २०२६ (बुधवार):मतदानाचा आदला दिवस (संपूर्ण दिवस), १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) : मतदानाचा दिवस (संपूर्ण दिवस), १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार): मतमोजणीचा दिवस (संपूर्ण दिवस).
कठोर कारवाईचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र देशी दारू नियम १९७३, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९६९ आणि महाराष्ट्र ताडी दुकाने नियम १९६८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. यामध्ये सर्व सीएल-३, एफएल-२, एफएल-३ (परवाना कक्ष), एफएल-४, एफएल/बीआर-२ आणि टीडी-१ (ताडी) यांसह सर्व किरकोळ मद्य विक्री केंद्रांचा समावेश आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


