Home सामाजिक ‘उमेद’च्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला नवी दिशा

‘उमेद’च्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला नवी दिशा

376

भद्रावती ‘उमेद’चा आनंदवनात अभ्यास दौरा

शाश्वत उपजीविका आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे महिलांना मिळाले प्रत्यक्ष धडे

भद्रावती : ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) नेहमीच तत्पर असते. याच अभियानाचा एक भाग म्हणून, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने उपजीविका कॅडरसाठी वरोरा येथील आनंदवन येथे एकदिवसीय अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

आधुनिक शेती व तंत्रज्ञानाची माहिती : या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या महिलांनी आनंदवनातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने रेशीम शेती, शेडनेटमधील आधुनिक शेती, फळबाग लागवड, फुलशेती आणि भाजीपाला उत्पादन यांसारख्या प्रकल्पांची तांत्रिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. विशेषतः रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते आणि नैसर्गिक कीटकनाशकांची निर्मिती कशी करावी, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना करण्यात आले.

पूरक व्यवसायांतून आर्थिक उन्नतीचा मार्ग : केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायांची जोड देऊन आर्थिक प्रगती कशी साधता येईल, यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. प्रशिक्षणार्थींनी शेळीपालन, कुक्कुटपालन, बदक पालन, ससा पालन, दुग्ध व्यवसाय आणि नर्सरी व्यवस्थापन या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.

सक्षमीकरणाचा विश्वास : या अभ्यास दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नवनवीन व्यवसायांची ओळख झाली आहे. येथे मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!