जन्मदात्यांची अंत्यविधीला गैरहजेरी
सावत्र भावांनी पार पाडला दाहसंस्कार
बल्लारपूर : समाजात जन्मदात्यांचे पवित्र नाते आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून रक्ताच्या नात्याचा त्यांना विसर पडला. थोरल्याने धाकट्या सख्या भावाचा बळी घेतला. मन सुन्न करणारी ही घटना गुरूवारी सकाळी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे उघडकीस आली. याघटनेमुळे समाजमन गहिवरले. या हत्याकांडातील आरोपी म्हणून थोरला भाऊ, जन्मदाते आईवडिल पोलीस कोठडीत गेले. अखेरचे अंत्यदर्शन देखील त्यांच्या नशिबात नव्हते. अखेर सावत्र भावांनी विसापूर हत्याकांडातील ‘त्या’ मृतकावर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विश्वनाथ झुंगा भोयर यांना पहिल्या पत्नीचे मनोज व जनार्दन ही दोन मुले आहेत. ती मरण पावल्यावर त्याने कौशल्या सोबत संसार थाटला. विश्वनाथ व कौशल्या यांच्या पोटी गुरूदास व गणेश ने जन्म घेतला. पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलाचे लग्न होऊन ते वेगवेगळे राहत होते. विश्वनाथ, कौशल्या, गुरूदास व मृतक गणेश एकत्र राहत होते. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ही दोन्ही मुले अविवाहित होती. मात्र मेहनतीचे काम करत असल्याने त्यांना दारू पिण्याचे व्यसन लागले.
. हेच व्यसन घात करणारे ठरले. बुधवारच्या रात्री त्यांच्यात क्षुल्लक पैशाच्या वादातून कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेले. थोरल्या गुरूदासने धाकट्या गणेशच्या डोक्यावर लोखंडी हातोडीसम वासल्याने जबर प्रहार केला. गणेश जागीच गतप्राण झाला.अशातच तिघांनी मिळून त्याच्या मृतदहाची परस्पर विल्हेवाट लावण्याची योजना आखली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराजवळ असलेल्या रेल्वे रूळावर मृतदेह टाकत असताना रेल्वे कर्मचारी दामाजी नरोटे यांच्या लक्षात आल्याने त्यांचा कट उघडकीस आला. यामुळे सारे बिंग फुटले.
. ह्रदयद्रावक घटनेत जन्मदाते व थोरला भाऊ सामिल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. यामुळे तिघांनाही ताब्यात घेतले. मृतक गणेशच्या शवविच्छेदनानंतर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वार्डातील शेजाऱ्यांनी आपपल्या ऐपतीप्रमाणे वर्गणी जमा करून सावत्र भाऊ मनोज व जनार्दन भोयर यांनी शोकाकुल वातावरणात गुरूवारी अंत्यविधी पार पाडला.
तिघांनाही तीन दिवसाची पोलीस कोठडी मृतक गणेश याच्या हत्याकांडात सहभागी असणारे त्याचा थोरला भाऊ गुरूदास, वडील विश्वनाथ व आई कौशल्या यांना शुक्रवारी बल्लारपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयात पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.


