Home चंद्रपुर जिल्हा विशेष साहेब ! घरकुलाच्या नादात घर पाडले अन, कुटुंब पडले उघड्यावर

साहेब ! घरकुलाच्या नादात घर पाडले अन, कुटुंब पडले उघड्यावर

457

दुसरा हप्ता कधी मिळणार ? लाभार्थ्यांचा टाहो

कडाक्याच्या थंडीत लाभार्थ्यांचे कुटुंब उघड्यावर

लाभार्थी संकटात ; प्रशासन कधी जागे होणार?

संदीप झाडे

   माजरी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. पहिला हप्ता जमा झाला. राहत घर पाडलं. घराचा पाया उभा झाला मात्र दुसरा हप्ताच जमा झाला नाही. परिणामी घरकुल लाभार्थ्यांचे कुटुंब ऐन कडक्याच्या थंडीत उघड्यावर पडले आहे. साहेब ! घरकुलाच्या नादात घर पाडले, दुसरा हप्ता कधी मिळणार ? अशी आर्त हाक माजरी येथील लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

.       प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत माजरी येथील घरकुल लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. घरकुल मिळणार या विश्वासावर अनेक लाभार्थ्यांनी आपली जुनी, मोडकळीस आलेली घरे पाडली. शासनाकडून मिळालेल्या पहिल्या हप्त्यात घराचा जोता बांधण्यात आला; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून दुसरा हप्ता न मिळाल्याने पुढील बांधकाम पूर्णतः ठप्प झाले आहे. घराचा पाया उभा असला तरी निधीअभावी भिंती उभ्या राहू शकलेल्या नाहीत. परिणामी अनेक गोरगरीब कुटुंबांना ताडपत्री, प्लास्टिक पत्रे किंवा तात्पुरत्या आडोशाखाली राहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुले, महिला व वृद्धांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आजारपणाचा धोका वाढला आहे.

.      दुसरा हप्ता मिळावा यासाठी लाभार्थी सातत्याने संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र “निधी आलेला नाही” एवढेच ठरलेले उत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. निधी कधी मिळणार, याबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा कालमर्यादा दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरीबांना हक्काचे छत देण्यासाठी राबविण्यात येते. मात्र निधी वितरणातील दिरंगाईमुळे माजरीतील लाभार्थ्यांवर संकट ओढावले असून, सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करूनही निधी वेळेवर न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

.       या प्रकरणात प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून दुसरा हप्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीबांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

“माजरी येथील घरकुल लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्व प्रकरणे नियमाप्रमाणे पूर्ण असून पहिल्या हप्त्यात बांधकाम सुरू झाले आहे. मात्र निधीअभावी दुसरा हप्ता मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. थंडीच्या काळात लाभार्थ्यांना विनाछत राहावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.”                                                                                                         रवि भोगे, ग्रामपंचायत सदस्य, माजरी

error: Content is protected !!