रविवारी लागणार निवडणूक निकाल
मतमोजणीसाठी ८ टेबलची व्यवस्था
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरला पार पडली. मात्र येथील प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेवरील निवडणूक २0 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून रविवार (२१) डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८ टेबलची व्यवस्था केली आहे. बल्लारपूर शहरात प्रथम नागरिक कोण होणार व नगरसेवक पदाची लाटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
. बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ८ महिलांनी निवडणुकीचे मैदान गाजवले. त्याच प्रमाणे 34 नगरसेवक पदांसाठी तब्बल १९२ उमेदवारांनी निवडून येण्यासाठी जीवाचे रान केले. येथील एकूण ८3 हजार ८२१ मतदारांपैकी ४६ हजार 3६0 मतदारांनी मताधिकार बजावला. यामध्ये २3 हजार ६२९ पुरुष व २२ हजार ७3१ महिला मतदारांचा समावेश आहे. येथील मतदानाची टक्केवारी ५५.3१ इतकी ठरली होती.
बल्लारपूर नगरपालिका निवडणूक मतमोजणी नगरपालिका कार्यालय ईमारत मध्ये होणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. एकूण ९५ मतदान केंद्रातील मतमोजणीसाठी ८ टेबलची व्यवस्था केली आहे. यासाठी २ राखीव मतमोजणी पथकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
. विशेष म्हणजे येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच गाजली असून मतदार नगराध्यक्ष कोण होणार, म्हणून तर्कवितर्क लावत आहे. येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून कांग्रेस पक्ष अस्तित्व मिळविण्यासाठी झुंज देत आहे. शिवसेना (उबाठा) पक्ष देखील आपलाच नगराध्यक्ष निवडून येणार म्हणून दावेदारी पुढे करत आहे. येथील मतदारांच्या तर्कवितर्काला रविवार (दि. २१) डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणी नंतर पूर्ण विराम मिळणार आहे.

